महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण

Table

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव बळवंतराव चव्हाण ज्यांना चव्हाण साहेब असं म्हणून देखील संबोधलं जातं, यांचा जन्म 12 मार्च 1913 साली भारतातील देवराष्ट्र येथे झाला. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा मोलाचा वाटा होता तसेच पुढे चालून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बनले. 1956-60 साली स्वतंत्र भारताच्या बॉम्बे राज्याचे ते तिसरे मुख्यमंत्री होते व जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.

यशवंतराव चव्हाण यांचे बालपण ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंतचा प्रवास

यशवंतराव चव्हाणांचा जन्म आणि बालपणाचा बराचसा काळ हा महाराष्टातील साताऱ्याजवळील एका गावात गेला. त्यांचे वडील हे एक शेतकरी होते. खडतर परिस्थिती असून देखील शिक्षणाबाबतीत मागे न पडता त्यांनी पुढे कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. इतिहास आणि राज्यशास्त्र यामध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी 1938 साली बॉम्बे विद्यापीठात पूर्ण केले. तसेच 1941 साली पुण्यातून कायदेविषयक पदवी त्यांनी मिळवली. किशोर वयात असतानाच महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याचे ठरविले. 1930 सालच्या गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल झाला. तसेच 1932 साली साताऱ्यामध्ये भारतीय ध्वज फडकवल्यामुळे त्यांना 18 महिण्यासाठी तुरुंगात जावे लागले, तसेच 1942 च्या भारत छोडो आंदोलनातदेखील त्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्रपूर्वीच्या महत्वाच्या चळवळींमध्ये ते अग्रेसर असल्यामुळे 1947 नंतर त्यांची गणना बॉम्बे राज्याच्या आणि पुढे महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख नेत्यांमध्ये होऊ लागली.

यशवंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

1946 साली मुंबई विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये चव्हाण साहेब काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी यशवंतराव चव्हाण यांची निवड पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून केली. नंतर 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या चिटणीस पदावर नियुक्ती झाली व 1952 च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून नेमण्यात आले. 1 नोव्हेंबर 1956 साली त्यांनी द्वैभाषिक मुंबईचे मुख्यमंत्री म्हणुन सूत्रे हाती घेतली , नंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि 1960 साली ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 ते 1966 या काळात ते भारताचे संरक्षण मंत्री तर पुढे 1966-1970 साली गृहमंत्री, आणि नंतर 1970-1974 पर्यंत अर्थमंत्री आणि 1974 पासून परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी चोख रित्या पार पाडली.

यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व आणि वारसा

यशवंतराव चव्हाणांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात निस्वार्थपणे कार्य केले. ‘जिंकू अथवा मारू’ या भावनेने स्वातंत्र्य लढ्यात जे जे तरुण उतरले त्यामध्ये चव्हाणांचा समावेश होता. परिस्थिती कशीही असो आव्हाने कशीही असो जी माणसे प्रयत्न करतात, ती माणसे नक्किच यशस्वी आणि मोठी होतात , हे यशवंतरावांनी सामान्य परीवारात जन्मलेल्यांना दाखवून दिले. एक आदर्श लोकशाही वर चालणारा समाज घडविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. प्रत्येक घटकातील मनुष्य स्वाभिमानाने जगला पाहिजे ,अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबरोबर सर्वांगीण विकास करण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले. यशवंत रावांनी जाती पातींबरोबर इथला माणूस पूर्णपणे जाणून घेतला होता. निसर्ग, इतिहास , संस्कृती , परंपरा यासंबंधी त्यांच्या मनात जिव्हाळा होता म्हणून देशाच्या राजकारणातील पंतप्रधान पद वगळता सर्वच पदे भूषवली परंतु धनसंपत्ती न कमवता जनतेची सेवा केल्या मुळे त्यांना कधीही पराभव पत्करावा लागला नाही.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्व विविधांगी होते . समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी त्यांचे जिवाभावाचे संबंध होते. एक कार्यक्षम मंत्री, त्याच बरोबर यशस्वी संसदपटू आणि जनसामान्यात ज्याची मुळे खोलवर रुजली आहेत, असा उदारमतवादी नेता असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. राजकारनात एकूण चाळीस वर्षांपेक्षा अधिक त्यांचा अनुभव होता आणि पंचवीसपेक्षा अधिक काळ अधिकारपदावर त्यांनी काढला आहे. ते एक उत्तम वक्ते आणि लेखक सुद्धा होते. त्यांची विचारप्रवर्तक भाषणे सह्याद्रीचे वारे (१९६२) व युगांतर (१९७०) या ग्रंथांतून संगृहीत केलेली आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रांत अनेक नव्या उपक्रमांना चालना दिली. हे उपक्रम ज्याप्रमाणे सहकारी साखर कारखानदारीचे आहेत, तसेच जिल्हा परिषदा, भाषा संचालनालय, साहित्य संस्कृति मंडळ वगैरे इत्यादी चे पुन आहेत. त्यांच्याबद्दल परप्रांतीयांना आशा वाटते, तर महाराष्ट्रीयनाना ते एक विश्वासाचे प्रतिक आहेत.

१९६९ साली काँग्रेसमध्ये फूट पडली गेली, तेव्हा ती सावरण्याच्या कामी यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले. देशात यादवीचे वातावरण न ठेवता समन्वयाचे असावे कारण भारतासारख्या प्रचंड, भिन्न भिन्न जातिधर्मांच्या देशात त्याखेरीज आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती होणार नाही, ही यशवंतरावांची धारणा आहे. पुरोगामी विचारांचा ते पाठपुरावा करतात. ते पोथीनिष्ठ नाहीत. नीतिमूल्यांचा पुरस्कार व्यवहारात व्हावा, अशी त्यांची इच्छा व प्रयत्न असतात. झगमगाटापेक्षा संथपणा, सातत्य हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे आणि तेच त्यांचे शक्तिस्थान आहे.

यशवंतराव चव्हाण मृत्यू

या थोर व्यक्तिमत्वाचा मृत्यू दिनांक २५ नोव्हेंबर १९८४ साली दिल्लीमध्ये झाला.

Leave a Comment