एक रात्र होती वैऱ्याची ! मराठी अत्भुत कथा.

Marathi storyएक रात्र वैऱ्याची

ती रात्र होतीच वैऱ्याची ! दिवसा हिरवागार, लांबलचक हातांप्रमाणे आपल्या फांद्या पसरत अवाढव्य असं रुप घेऊन जो कोणी त्याच्या सावलीत उन्हाच्या झळांपासून क्षणभर विश्रांती घेण्यास येईल त्याला आत्मिक सुख देणारा वटवृक्ष रात्री मात्र कोष्टीकाने विणलेल्या मृत्यूच्या जाळ्याप्रमाणे भासत होता, त्याच्या पारंब्या एका भयंकर राक्षसाच्या जटांप्रमाने कोणालाही जखडून मृत्यूच्या विळख्यात बंदिस्त करून टाकतील अगदी तश्याच दिसत होत्या. त्याच वटवृक्षावर बसलेल्या घुबडाचे डोळे काही न करताच मनामध्ये भीतीची काहूर आणतील अशीच दिसत होते, त्याचा तो घुर घुर नारा आवाज आणि मानेला लचका देत फिरणारे त्याचे तोंड शिकार करण्याच्या तयारीत असण्याचा जणू दावाच करीत होतं. दिवसा चिमण्या कबुतरांच्या थव्याने आस्मान, डोळे स्थिरावणारं नजारा निर्माण करायचं,पण रात्री वटवाघूळांच्या त्या घिरट्या घालण्यानं तेच आस्मान डोळ्यांत भीती भरायचं.

Marathi storyएक रात्र वैऱ्याची


डोळे मिटून त्या भयानक दृश्यापासून वाचता येईलही पण दूरवरून कुत्र्याच्या इवळण्याचा आवाज अंगावर नकळत काटा आणल्याशिवाय राहत नव्हता. धडधाकट माणसाला सुद्धा धास्ती भरेल अशा त्या रात्री सुमसान रस्त्यावर एक सावली दिसली. हळू हळू सावली जवळ आली तर त्याबरोबर हुंदका देत रडण्याचा सुद्धा आवाज येऊ लागला अधून मधून त्याच्या तोंडून “आई, आई!” अशी नाजूक हाक बाहेर पडत होती. अवघ्या 3-4 वर्षाचं पोरं त्या रात्री गावच्या रस्त्यावरुन आपली छोटी छोटी पावले टाकत चालत होतं, रडून रडून डोळे सुजले होते, बोबड्या बोलीतून, बसलेल्या घशातून तो नाजूक आवाज तो छोटासा जीव घाबरून गेलाय याची खात्री करून देत होता. त्याची पावले पडत तर होती पण त्या पावलांना दिशा माहीत नव्हती, त्याचे डोळे त्याच्या आईचा किंवा ओळखीच्या कोणाचातरी शोध घेत होते. एवढ्या भयंकर रात्री ते छोटंसं मूल हरवलं होतं, गावच्या वाटेवर जिथे दोन्ही बाजूला लांबवर पसरलेलं रान आणि 100 भर पावलांवर एक आरधं घर आणि मधेच पारंब्या पसरलेलं वडाचं झाड या शिवाय कोणीच नव्हतं अशा त्या वाटेवर ते मूल चालत होतं.

Marathi storyएक रात्र वैऱ्याची...


“आई … आई… कुठेएस तू ? ये ना आता समोर , मला भीती वाटतीय… मी नाही देणार त्रास तुला, परत परत चॉकलेट पण नाही मागणार आणि खेळायला पण नाही जाणार तू म्हणशील तो अभ्यास करतो , दूध भाकरच खातो दुकानातला खाऊ नको मला, तुझं सगळं ऐकतो पण येणा तू समोर!” असं बोलत बोलत पाय थकलेलं होते तरी ते पोर चालतच होतं. “आता मी एवढं बोलतोय तरी तू ऐकत नाहीस, मला भीती वाटतीय खूप ,आजी सांगते त्या गोष्टीतलं भूत बित आलं तर? त्यांनी मला नेलं तर ? आई………..! आणि आताच कसंबस त्या कुत्तु पासून हळू हळू चालत आलो, झोपला होता म्हणून बरं नाहीतर चावलाच असता मला, बाबां एवढा मोठा झालो ना मग कसा मारतो बघ मी त्याला, सारखं भूकत असतो मला.

Marathi storyएक रात्र वैऱ्याची..

पाय पण दुखताय गं आई, कुठेय आपलं घर? मला चोरांनी पकडलं तर, नाही नाही मी पळतो म्हणजे चोर आले तरी त्यांना मला पकडता येणार नाही!” चिमुकले पाय हळू हळू पळू लागले पण छोटासाच तो जीव थोडंस अंतर पळाला आणि थकून गेला, धाप लागली तरी बोलणं काही थांबेना. “कोणच कसं दिसणा रस्त्यावर , घरीतर रोज कोण ना कोण येतं, एबीसीडी बोल , एक-दोन बोल , डान्स करून दाखव, मी आता सगळं करतो पण मला माझी आई द्या हो!” असं बोलत त्याने पुन्हा रडणं सुरू केलं , रडणं चालूच होतं त्याबरोबर पाय सुद्धा हळू हळू पडतच होते. रडून रडून नाकातून शेंबूड येत होता ,हाताने कसा बसा पुसत छोट्या मोठ्या झुडपातून येणाऱ्या किर्र किर्र आशा रातकिड्यांच्या आवाजात त्याचं रडणं खूप निरागस वाटत होतं. हळू हळू रडणं कमी झालं, डोळ्यातील आसवं सुकून गेली.

Marathi storyएक रात्र वैऱ्याची


“बास झालं , आता मीच येणार नाही आई तुझ्याकडे, मी रुसलोय आता, बाबांना नाव सांगतो का नाही बघ तुझं!” अशी तक्रार तो करत होता, वरती आकाशाकडे पाहत चालू लागला. “आरे, चांदोबा! तुला पण तुझं घर सापडत नाही का? की आईने घरी घेतलंच नाही तुला? घरी गेला नाहीस आजून? झोपतोस की नाही? आजी गोष्ट सांगते ती ऐकत तुला बघत बघत मी रोज झोपतो, मला वाटलं तू ही झोपत असशील माझ्यासारखा, पण तू तर जागीच आहेस, कोणीच नाहीये सोबत तुझ्या ? पण तू माझ्या सोबत का चालतोय? हे काय मी थांबलो की तू पण थांबतोयस.. तुला नाही शोधायचं का तुझं घर? बर ठीक आहे , असंच सोबत रहा माझ्याबरोबर मला भीती वाटते बाबा! आरे थांब थांब लपू नको ढगांमागे, चांदोबा ,नको ना रे लपा छुपी खेळू, मी दमलोय आता, उद्या खेळू वाटलं तर आपण वाटलं तर मी पहिला डाव घेतो पण तू आता फक्त माझ्या सोबत रहा! आता कसं ऐकलस आलास किणी ढगांच्या बाहेर, पण आपण दोघंच खेळायचं, आईला आणि दादाला घ्यायचं नाही , बघितलं ना तू, मला एकटं टाकून कुठे जाऊन बसलेत!” स्वतःशीच बडबड करत चालत तो चालत होता, इतक्यात आकाशातील एक पक्षी जोरात येऊन त्याच्या डोक्यावरून गेला.

“आई.. आई…. भूत.. भूत… भूत… “
असं ओरडत तो पळत सुटला ,भयंकर घाबरून गेला होता , शरीर खूप थकून गेलं होतं, तहान लागली होती, पण त्याहीपेक्षा जास्त ओढ त्याला त्याच्या आईला भेटण्याची होती. शेवटी थकलेला जीव एका मोठ्या झाडाजवळ येऊन थांबतो. “गेलं वाटत भूत, पण परत आलं तर, असं करतो या झाडामागे लपतो , त्याला दिसणारच नाही.” असं बोलून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने झाडाचा आडोसा घेत झाडाला टेकून तो तिथेच बसला. आता मात्र तो खूप थकला होता, डोळे थकून गेले होते, धाप लागून पोटाला भूक सुद्धा लागली होती, दमल्यासारखं झालं आणि बसल्या बसल्या तो तिथेच झोपी गेला. रात्रीचा काळोख कमी होत गेला, सूर्य वर वर यावा तशी खायला उठलेली रात्र कुठल्या कुठे पळून गेली. गाव जागी झाला होता. एका आईची मात्र झोप उडाली होती, रात्री तिच्या बाजूला झोपलेला तिचा मुलगा सकाळी तिच्या बाजूला नव्हता, घरातल्या सोबत सैरा वैरा सगळीकडे ती त्याला शोधू लागली, एवढंस लेकरू कुठे गेलं असेल? कोणी पळवलं तर नसेल, कुठे असेल? रानाच्या विहरिकडे ? नाही नाही असं काही नसेल.

अशा प्रश्नाने ती व्याकुळ होऊन गेली होती, घरातले सगळेच चारी बाजूला पांगुण त्याचा शोध घेत होते, कोणी घराचा कोपरा कोपरा पाहत होतं, कोणी राणाकडे धुंडाळत होतं, त्या आईच्या मोठ्याभावाने गाडी काढली आणि तो गावच्या रस्त्याने आजूबाजूला पाहत त्याला शोधत निघाला. थोडं अंतर कापलं तसं लांब एका झाडाच्या आडोशाला लाल सदरा उठून दिसत होता, जवळ जाईल तसं तो त्यांच्याच घरचा चिनू आहे हे समजलं .गरीब ,दया येईल अशा अवस्थेत विळखा करून झोपला होता , त्याला अलगत उचलून गाडीवर घेऊन तो घरी परतला. आपल्या छोट्याश्या मुलाला पाहून जिवात जीव आलेली आई त्याला पाहताच रडू लागली त्याला जीवाशी कवटाळत पोटच्या गोळ्याला जवळ करून , काय झालं? कसं झालं? हे बाजूला ठेवत तो सुखरूप आहे यात समाधान मानत त्याला घेऊन घरामध्ये गेली…


खरंच ती रात्र वैऱ्याची होती !

Leave a Comment