कॅलेंडर – कोण म्हणतं निर्जीव वस्तूंमध्ये भावना नसतात!

कॅलेंडर


दरवाज्याची कडी वाजते तशी स्वयंपाक घरात आवरा आवर करत बसलेली ती , गळ्यावरच्या ओढणीने चेहऱ्यावर थोडासा निर्माण झालेला घाम पुसत अस्थाव्यस्त झालेले केस एकत्र ओढून बांधत दरवाज्याकडे जाऊ लागते. आता निशांत म्हणजे तिच्या नवऱ्याची कामावरून यायची वेळ झालीये आणि दरवाज्यावर तोच आहे हे तिला माहीत होतं त्यामुळे थोड्या घाईमध्ये तिची पाऊले पडू लागली.

लगेच ती दरवाजा उघडते, तर काय निशांतच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता, त्याच्या हातातील कामाची बॅग ती तिच्या हातात घेते व पुन्हा आत मध्ये चालली जाऊ लागते. जाता जाता त्याची बॅग सोफ्यावर ठेवत बोलते ,”निशांत आज खूपच थकलेला दिसतो आहेस?, आज पण बॉसची किरकिर ऐकलीस का काय?” असं बोलून ती पुन्हा स्वयंपाक घरात घेली. मांडणीवरून एक ग्लास काढून त्यामध्ये फ्रीजमधल्या बोटलमधले पाणी आरध्या पर्यंत भरते आणि आरधा ग्लास साध्या पाण्याने भरत.

तो भरलेला ग्लास घेऊन आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर निशांतने दिलंच नाही हे लक्षात घेत त्याकडे जाते. भरलेला ग्लास त्याला देतं पुन्हा विचारू लागते,”निशांत ! आरे मी विचारलं मगाशी काही तर तुला, तू काही बोलला नाहीस ?” तिच्या हातातील ग्लास ओठांना लावत एकाच घोटात घटा घट पाणी पिऊन घेत घाईने उठत म्हणाला,”मी थोडं हात पाय धुवून येतो!” असं म्हणत बेडरूम कडे गेला.

खूपच दमलाय बहुतेक असं समजून ती सुद्धा स्वयंपाक घरात राहिलेलं काम करायला जाते. चपातीसाठी पीठ मळून झाल्यावर तिच्या लक्षात येते की घरात भाजी साठी काहीच नाहीये , आणि तिने निशांतला कामावरून येताना भाजी आणण्यास सांगितले होते. ती पुन्हा उठून हॉलमध्ये बसलेल्या निशांतकडे जाते त्याची बॅग खोलून पाहते तर त्यामध्ये भाजी नव्हती, बॅग खाली ठेवत विचारू लागते,”आरे मी तुला बोलले होते ना, की कामावरून येता येता मंडईमधून भाजीपाला घेऊन ये म्हणून पुन्हा विसरलास का?” निशांत तसाच गप्प बसून राहतो, काहीच उत्तर देत नाही. “मी काय बोलतीय निशांत, लक्ष कुठेय तुझं, भाजी आणायला कसा विसरलास, आता स्वयंपाक करायला काहीच नाहीये , काय करू मी आतां ?

“”ए बस्स झाली तुझी किटकीट!” बसलेला निशांत रागात ओरडत उभा राहून बोलू लागला तोच ती म्हणाली,”निशांत, मी फक्त एवढंच विचारलं, भाजी का आणली नाहीस , त्यात एवढं चिढायला काय झालं?” रागात डोळे लाल झालेला निशांत पुन्हा बोलू लागला, ” काय झालं? दिवसभर तो साहेब कामाला बांधून ठेवतो वर कोणत्याही क्षुल्लक कारणावरून खरडपट्टी काढतो, वर घरी आलं तर घरी पण तेच , कुठेच शांतता नाही , घर नोकरी नुसता राबायचं , वर भाजी का नाही आणली म्हणून तुझी बोलणी खा, वैतागून गेलोय नुसता लग्न झाल्यापासुन !

” त्यावर ती बोलू लागली, “म्हणजे सगळी माझी चूक आहे तर?” “हो ! तुझीच चूक आहे!” असे बोलून दोघांचे जोरदार भांडण पेटले, निशांतने खूप काही सुनावले तिला. अखेर दोघेही गप्प झाले. घरात सर्वत्र शांतता पसरली होती,लग्न झाल्यानंतर १ वर्षानंतर दरवेळेस छोटी छोटी भांडणं व्हायची पण आजच्या त्या दोघांमधील वादामुळे घराच्या भिंती देखील शहारून निघाल्या होत्या. भांडणानंतरची शांतता भांडणापेक्षाही जास्त त्रासदायक होती. ती राग – राग करत बेडरूम मधे गेली , हा सुद्धा विचारांच्या भवऱ्यात अडकून खिडकी शेजारील भिंतीचा आधार घेऊन उभा होता.

अफाट वारा सुटला होता, उघड्या खिडकीतून त्याच्या जोरदार लहरी घरात आवाज करत येत होत्या. त्या वाऱ्यामुळे भिंतीवरील कॅलेंडर झोका घेत होतं आणि अलगत भिंतीवर आपटत होतं. एक वाऱ्याची मोठी झुळूक आली आणि ते कॅलेंडर खाली पडलं.

विचारांमध्ये गुंतलेला तो त्यामुळे भानावर आला आणि ते कॅलेंडर परत त्याच्या जागी लावण्यास त्याने उचललं. नवीन वर्षी खरेदी केल्यानंतर आज त्याची नजर त्यावर पडली होती, आणि ते त्याला वेगळं भासलं. चुर्घळून गेलेलं कॅलेंडर डोळ्या जवळ नेत त्याने पाहिलं की प्रत्येक आठवड्याच्या २-३ तारखांवर काही ना काही नोंद आहे.घराचा किराणा ४ तारखेला आणला, दर रविवारी इस्त्री वाल्याकडून कपडे आणले त्याचे पैसे, गॅस १२ तारखेला संपला, विजेचं बिल १० तारखेला भरलं, आठवड्याची भाजी, दूध वाल्याचे राहिलेले पैसे, महिन्याच्या शेवटी एकूण खर्चाची बेरीज, आणि महिन्यातील बचत सुद्धा त्यावर नोंदली होती.

हे सर्व पाहताना त्याला लक्षात आले की यामध्ये कोणत्याच कामात त्याचा सहभाग नाहीये , ती एकटी त्याला नकळत एवढ्या गोष्टी करते वरून घरकामासोबत तिचं ऑफिस… कसं काय एवढं सगळं जमतं हिला, आणि आपण मात्र तिला दोष देऊन भांडत राहिलो. चूक लक्षात आली, जाऊन विश्वासात घेऊन त्याने तिला मिठी मारली आणि संसाराची गाडी पुन्हा धावू लागली. कोण म्हणतं निर्जीव वस्तूंमध्ये भावना नसतात ?

कॅलेंडर…….

Leave a Comment